शिवांगी बेकर्सचा गॅस पुरवठा खंडित, पारले जी कंपनीच्या ४७५ कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार कायम..!
खामगाव (अजयसिंह राजपूत):
आखाती युद्धाचे चटके आता थेट विदर्भातील ग्रामीण भागातील उद्योगांना बसू लागले आहेत. खामगाव येथील शिवांगी बेकर्स (पारले-जी) या नामांकित कंपनीचा गॅस पुरवठा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे कंपनीतील उत्पादन ठप्प झाले असून, तब्बल ४७५ कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यवस्थापनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करूनही अद्याप गॅस पुरवठा सुरळीत न झाल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवांगी बेकर्सला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जळगाव प्लांटकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, ११ मार्च २०२६ पासून हा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन संकटामुळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जळगाव प्लांटकडून होणारा एलपीजी पुरवठा ११ मार्च २०२६ पासून बंद आहे. कंपनीला दररोज ८० मेट्रिक टन बिस्किटांच्या उत्पादनासाठी सुमारे ३ मेट्रिक टन गॅसची आवश्यकता असते. हा पुरवठा थांबल्याने कंपनीचे दोन्ही प्लांट सध्या बंद अवस्थेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, पण तोडगा नाही
कंपनीचे संचालक प्रकाश केडिया यांनी जिल्हाधिकारी आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. "कमीत कमी ५० ते ६० टक्के गॅस पुरवठा उपलब्ध करून दिल्यास आम्ही एक उत्पादन लाईन सुरू ठेवू शकतो, ज्यामुळे कामगारांचा रोजगार वाचेल," अशी विनंती व्यवस्थापनाने केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.आर्थिक संकटाची टांगती तलवार गेल्या १०-१२ दिवसांपासून उत्पादन बंद असल्याने कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. कामगारांना काम नसताना पगार देणे व्यवस्थापनाला कठीण होत असून,अन्न-बिस्किट सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कामगारांच्या संतप्त प्रतिक्रिया
"आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीत काम करत आहोत. अचानक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे काम थांबले आहे. घरात म्हातारे आई-वडील आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आता समोर उभा आहे."
— घनश्याम सावरकर (कामगार, शिवांगी बेकर्स)
"एक दिवसाचा पगार बुडाला तरी आमचे बजेट कोलमडते, इथे तर १०-१२ दिवसांपासून काम बंद आहे.आमची चूल कशी पेटणार, याचा विचार करायला हवा.":- जयसिंह बघेल (कामगार प्रतिनिधी)
उत्पादन ठप्प असल्याने कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे काम करणाऱ्या ४७५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. काम नसेल तर पगार कसा द्यायचा? आणि पगार नसेल तर ही कुटुंबे कशी जगणार? प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन इंधनाचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा हा उद्योग कायमचा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे." :- अभय अग्रवाल (संचालक शिवांगी बेकर्स)

Post a Comment
0 Comments