*पातुर्डा येथील शिक्षीका यांचा अपघाताचा बनाव रचून पत्नीचा खून; ‘सुपारी’ देणाऱ्या पतीसह तीन आरोपी ना जळगाव जामोद पोलीसांनी बेड्या ठोकल्या*
(जळगाव जामोद प्रतीनीधी : )
अपघाताचा बनाव रचून पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीचा कट जळगाव जामोद पोलिसांनी उधळून लावला आहे. मित्राच्या मदतीने सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे.२ मार्च २०२६ रोजी वृषाली प्रकाश गावंडे (रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर) या आपल्या स्कुटीने (MH 28 AL 5815) पिंपळगाव काळे येथे कामावर जात होत्या. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला मागून जोराची धडक दिली, ज्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.सुरुवातीला याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मृत वृषाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. यावरून पोलीस अधिक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मपोउपनि स्नेहा शेडगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धक्कादायक माहिती मिळवली.तपासात असे समोर आले की, मृत वृषाली यांचा पती प्रकाश गावंडे याने त्याचा मित्र मंगेश चहुळकर याच्या मदतीने हा कट रचला होता. त्यांनी वाहन चालक मंगेश सूर्यवंशी (रा. जगदंबा नगर, शेगाव) यालासुपारी देऊन हा अपघात घडवून आणला होता.मृत वृषालीचा लग्नानंतर पती व सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ होत होता.
यापूर्वी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम ४९८ अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता.
दोघांमध्ये तडजोड होऊन त्या पुन्हा पतीसोबत राहत होत्या, मात्र पती सातत्याने घटस्फोटासाठी त्रास देत होता. त्यातूनच हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सुपारीचे पैसे जप्त करण्यात आले आहेत. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस निरीक्षक नितीकुमार पाटील, मपोउपनि स्नेहा शेडगे, पोहेकॉ भागवत उंबरहंडे आणि चालक पोहेकॉ मानकर यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments