: (लोणार प्रतिनिधी)
लोणार सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुली - महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि हत्यांच्या घटनांमुळे सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप होत आहे. गुन्हेगारीत वाढ तर सभ्यता व माणुसकी सरणावर दिसून येत आहे.
एका 21 वर्षीय विकृत तरुणाने महिलेचा चेहरा मॉर्फ करुन अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअॅपवर प्रसारित केल्याने त्याला लोणार पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीबी (जि. बुलढाणा) येथील एका महिलेने तक्रार दिली होती की, तिच्या चेहऱ्याचा वापर करुन अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. आरोपीने हे व्हिडिओ पीडित महिलेसह गावातील इतर महिलांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. इतकेच नाही तर, आपली ओळख लपवून आरोपीने महिलांना नग्न व्हिडिओ कॉल देखील केले होते. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण होते. महिलेच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी तांत्रिक तपास चक्रे फिरवली. तपासाअंती रवि गजानन वायाळ (वय 21, रा. खळेगाव, ता. लोणार) याला निष्पन्न करून दि. 8 मे रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला 20,500 रुपये किमतीचा 'One Plus' कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तपासात पो.नि. प्रकाश सदगीर, पोकाँ गणेश लोढे, अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर सायबर सेलचे राजू आडवे आणि पवन मखमले यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. दरम्यान महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार, बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि अल्पवयीन मुलींवर होणारे हल्ले यांसारख्या गंभीर घटनांमुळे महिला सुरक्षिततेचे धिंडवडे निघत असून, चिंतादायी चित्र आहे. दररोज समोर येणाऱ्या भयानक घटनांमुळे कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न जनता विचारत आहे.

Post a Comment
0 Comments