जिगाव पुनर्वसन प्रकल्पात शासकीय वाहनांचा गैरवापर, टेंडर प्रक्रियेत अनियमितता आणि चालकाची फसवणूक – गंभीर आरोप
(रंजना राठोड खामगांव)
बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव पुनर्वसन विभागात शासकीय पदाचा वापर करून नियमांना धाब्यावर बसवून मनमानी, भ्रष्टाचार आणि एका कंत्राटी वाहन चालकावर अन्याय केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. संबंधित प्रकरणात कार्यकारी अभियंता तुषार मेतकर, उपविभागीय अभियंता उमेश पाटील, आणि कंत्राटदार नाना देशमुख यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत.
कंत्राटी चालक शुभम चव्हाण यांची फसवणूक
शुभम राजाराम चव्हाण (रा. शिर्ला नेमाणे, ता. खामगाव) हे दिनांक 25 एप्रिल 2022 पासून शासकीय वाहन (MH 28 C 6550) वर कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून कार्यरत होते. मात्र 13 मार्च 2025 रोजी उपविभागीय अभियंता उमेश पाटील यांनी कोणताही लेखी आदेश न देता फक्त तोंडी सांगून त्यांना कामावरून काढले.
पगारासह सुमारे ₹80,000 ते ₹90,000 पर्यंतचा अतिकालीन भत्ता थकविण्यात आला असून, वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार, माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही काहीही उत्तर मिळालेले नाही. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतात, विचारणा केली तरी "तुला अधिकार नाही, काय करायचं ते कर" अशा स्वरूपात धमकीवजा उत्तरं दिली जातात.
शासकीय वाहनांचा नियमबाह्य वापर
कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांच्याबाबत आरोप आहे की, त्यांनी शासकीय नियमानुसार वापरायची परवानगी नसलेले इनोव्हा वाहन शासकीय कामासाठी वापरले. शिवाय, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सुट्टी असताना हेच वाहन कुटुंबासह नागपूर सहलीसाठी वापरण्यात आले.
याचप्रमाणे, शासकीय वाहन MH 28 C 6550 याच्या डिझेल पावत्यांचा वापर त्यांच्या खासगी कारसाठी करण्यात आला, असा गंभीर आरोप शुभम चव्हाण यांनी केला आहे.
कार्यालयात नातेवाईकांची वाहनं, नियमबाह्य टेंडर देणे
शुभम चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डेप्युटी इंजिनिअर यांनी स्वतःची व नातेवाईकांची खासगी वाहने कार्यालयात लावलेली आहेत, जी शासकीय कामासाठी वापरली जात आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, कंत्राटदार नाना देशमुख हे प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांचे खासगी वाहनचालक असूनही त्यांनाच वाहन पुरवठ्याचे टेंडर देण्यात आले. टेंडर मिळताना नानाकडे आवश्यक असा GST नंबरही नव्हता. यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य व बनावट असल्याचे स्पष्ट होते. या सर्व प्रक्रियेसाठी मुख्य जबाबदार म्हणून तुषार मेतकर यांचे नाव समोर येत आहे.
शासकीय कार्यालयात महापुरुषांच्या जयंतींची अवहेलना
शुभम चव्हाण यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला की, 15 फेब्रुवारी 2025 रोजी सेवालाल महाराज जयंती ही कार्यालयात साजरीच करण्यात आलेली नाही, जी सरकारी नियमांचे उल्लंघन आहे.
अधिकाऱ्यांचा उद्धटपणा आणि प्रशासकीय दुर्लक्ष – एकाच वेळी दिसून येतंय
शुभम यांना कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांनी स्पष्टपणे धमकी दिली होती की – "कोर्टात जा, मंत्रालयात जा, आम्हाला काही फरक पडत नाही". या विधानामुळे प्रशासकीय यंत्रणेतील असंवेदनशीलता व सत्तेचा अहंभाव स्पष्टपणे दिसतो.
प्रश्न उपस्थित करणारे मुद्दे:
कंत्राटी चालकाला तोंडी आदेश देऊन कामावरून का काढले?
अधिकारी व कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित का असतात?
महापुरुषांच्या जयंती साजऱ्या न होण्यामागचं कारण काय?
खासगी वाहनात शासकीय डिझेल वापरला गेला, याची चौकशी झाली का?
टेंडर प्रक्रिया करताना नियमबाह्य पद्धत का वापरली गेली?
न्यायासाठी संघर्ष सुरूच – शुभम चव्हाण यांची मागणी
शुभम चव्हाण यांनी मुख्यमंत्री, मंत्रालय, पोलीस, आणि प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली असून, त्यांनी मागणी केली आहे की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर पुढे काही विपरीत घडलं, तर त्यास जबाबदार हेच अधिकारी असतील."
प्रशासन, संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बातमीची पुढील माहिती आणि तपशील लवकरच आपल्या समोर मांडल्या जाईल.

Post a Comment
0 Comments