कुऱ्हा काकोडा येथे पत्रकार बंधूंचा सन्मान, सत्कार
मूल्याधिष्ठित व सकारात्मक पत्रकारितेची गरज – डॉ. राजेश राजोरे
(सुनिल जगताप मुक्ताईनगर जळगाव)
कुऱ्हा काकोडा (जळगाव) : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथे प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात कुऱ्हा परिसरातील पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडला.
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, "पत्रकारितेतील वास्तव" या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, दैनिक देशोन्नती _ बुलढाणा आवृत्तीचे संपादक डॉ. राजेश राजोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके यांनी आपल्या प्रास्ताविकात ब्रेकिंग न्यूजच्या नादात सत्याऐवजी अर्धसत्य किंवा विकृत बातम्या प्रसारित होत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, "सुजान पत्रकार म्हणून देश, समाज आणि आपल्या भागासाठी योग्य गोष्टी जास्तीत जास्त प्रसारित कराव्या. कुऱ्हा सारख्या दुर्गम भागात यशस्वी आणि सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा अभिमान वाटतो."
डॉ. राजेश राजोरे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "हा कार्यक्रम छोटेखानी जरी असला तरी संस्थेच्या वतीने पत्रकारांच्या सामाजिक ऋणाची जाणीव करून देणारा आहे. पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे आणि संस्था ही गोष्ट जाणते याचा आनंद वाटतो."
ते पुढे म्हणाले, "समाजातील प्रत्येक क्षेत्रात दर्जा घसरला आहे – शिक्षणात, राजकारणात, पत्रकारितेत, उद्योगात. ही अवकळा दूर करण्यासाठी पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी. सत्यनिष्ठता, निष्पक्षता, स्वातंत्र्य, निर्भयता, सामाजिक जबाबदारी, बातमी आणि मत यात स्पष्ट फरक राखणे, खाजगी जीवनाचा सन्मान, पीडितांबद्दल संवेदनशीलता ही मूल्ये जपली पाहिजेत. पत्रकारांनी नेहमी सत्याची कास धरावी."
सकारात्मक पत्रकारितेची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, "आज समाजात सकारात्मक पत्रकारितेची आवश्यकता आहे. चांगल्या बातम्या, समाजात बदल घडवणाऱ्या घटना फ्रंट पेजवर द्याव्या. क्रिकेट, सिनेमा आणि क्राईम यांना अतिमहत्त्व दिल्याने समाजावर विपरीत परिणाम होतो. याला मीडिया जबाबदार आहे. सकारात्मक पत्रकारितेने चांगला बदल घडवता येईल."
पत्रकाराचे कर्तव्य सांगताना त्यांनी एक सुंदर उपमा सांगितली: "पत्रकाराने एका हातात आरसा आणि दुसऱ्या हातात दिवा ठेवावा. समाजाला त्याचा खरा चेहरा दाखवण्यासाठी आरशाचा आणि अंधार दूर करण्यासाठी दिव्याचा वापर करावा."
शेवटी ते म्हणाले, "पत्रकार हा सत्यता, पारदर्शकता व सामाजिक जबाबदारीने पूर्ण असावा." यासाठी त्यांनी प्रसिद्ध शेर उद्धृत केला:
"मैं आईना हूँ मेरी अपनी जिम्मेवारी हैं,
जिस किसी को पसंद ना हो, वो सामने से हट जाए।"
कुऱ्हा परिसरातील स्थानिक पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार श्री. विनायक वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "आमच्यासारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्यांना शैक्षणिक संस्थेने सन्मानित केले ही आमच्याकरिता अभिमानाची बाब आहे. आज वृत्तपत्रांसमोर डिजिटल आणि सोशल मीडिया पेक्षा जास्त आव्हाने आहेत, कारण आजची बातमी उद्या वृत्तपत्रात छापून येते तिथपर्यंत डिजिटल मीडियात ती व्हायरल झालेली असते."
विशेष उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमात वरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. सुनील काळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी शिवलकर यांनी सत्कार केला.
उपस्थित मान्यवरांमध्ये शांतारामभाऊ कांडेलकर, संस्थेचे सचिव श्री. भालचंद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष श्री. प्रल्हादजी बढे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. पिंगळे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, पत्रकार हरदीपसिंग जाट यांचा समावेश होता.
सन्मान सोहळ्यात कुऱ्हा परिसरातील पत्रकार श्री. किशोर पांढरकर, रवींद्र हिरोळे, विलास जळमकार, सुनील जगताप इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते.
सर्व पत्रकारांना महाविद्यालयाच्या वतीने पेन, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. मनोज वाघ, गजानन गलवाडे, गजानन बिलेवार यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम पत्रकारितेच्या आदर्शांना जपण्यासाठी, सकारात्मक दिशेने समाजाला प्रेरित करण्यासाठी आणि दुर्गम भागातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम पाऊल ठरला.

Post a Comment
0 Comments