Type Here to Get Search Results !

प्रशासकीय दुर्लक्ष! निंबी गावात स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही स्मशानभूमी नाही; अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांची मोठी कसरत.

 प्रशासकीय दुर्लक्ष! शेगांव तालुक्यातील निंबी गावात स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही स्मशानभूमी नाही; अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांची मोठी कसरत.



निंबी (अजयसिंह राजपूत):"माणसाला जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत तरी चालतील, पण किमान मरणानंतर तरी सन्मान मिळावा," ही निंबी (ता. शेगाव) येथील ग्रामस्थांची आर्त हाक प्रशासनाच्या बहिऱ्या कानापर्यंत पोहोचलेली नाही. स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा होऊन ७८ वर्षे उलटली, तरी या गावाला हक्काची स्मशानभूमी मिळू शकलेली नाही.एकीकडे देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना, शेगाव तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांना मात्र मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठे, हा मोठा प्रश्न असतो. अनेकदा ओळखीच्या व्यक्तीच्या शेतात किंवा नदीकाठी उघड्यावर सरण रचले जाते. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही कागदावरच असल्याने, चिखलातून गुडघाभर पाय रोवत खांदा देणाऱ्यांची मोठी कसरत होते. "ज्या शेतातून प्रेत नेले जाते, त्या शेतमालकाचे आणि ग्रामस्थांचे अनेकदा वाद होतात, पण पर्याय नसल्याने अपमान सोसून अंत्यविधी उरकावा लागतो," असे ग्रामस्थ सांगतात.

गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना उघड्यावर किंवा शेतात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. विशेषतः पावसाळ्यात मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना अतोनात हाल सोसावे लागतात.

पावसाळ्यात परिस्थिती बिकट

निंबी हे शेगाव तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. मात्र, या गावात आजतागायत हक्काची स्मशानभूमी आणि तिथे पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसांत जर कोणाचा मृत्यू झाला, तर चिखलातून वाट काढत प्रेत न्यावे लागते. पावसापासून बचावासाठी कोणतेही शेड नसल्याने प्लास्टिक कागदाचा आधार घेऊन अंत्यविधी उरकावा लागतो, ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.

स्मशानभूमीसाठी शासनाची जागा उपलब्ध नसल्याचे कारण वारंवार दिले जाते.अनेकवेळा मौखिक, लेखी तक्रारी, निवेदने देऊनही लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही.हक्काचा मार्ग नसल्याने स्मशानभूमीच्या परिसरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात अंत्ययात्रा चिखलातून न्यावी लागते.

"पिढ्यानपिढ्या आमच्या गावात हीच समस्या आहे. लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात, पण आमच्या मूलभूत गरजांकडे कोणाचेही लक्ष नाही. जर लवकरच स्मशानभूमीचा प्रश्न सुटला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू," अशी संतप्त भावना निंबी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता या गंभीर प्रश्नावर जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments