*बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा अवैध वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार*
मोताळा (जि. बुलडाणा), १६ मे २०२६
रस्त्याच्या कडेला शासनाने लावलेल्या झाडांचा वाली कोण? संरक्षण व संवर्धन फक्त नावापुरतेच असल्याचे चित्र मोताळा तालुक्यातील महामार्ग व इतर रस्त्यांवर स्पष्ट दिसत आहे. काही शेतकऱ्यांकडून अवैध वृक्षतोडीसोबतच जुनी झाडे जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
शासन दरवर्षी सामाजिक वनीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) व विविध योजनांद्वारे रस्त्याच्या दुतर्फा लाखो झाडे लावते. या झाडांमुळे वाटसरूंना उन्हापासून संरक्षण, मातीची धूप रोखणे, पावसाचे प्रमाण वाढणे, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि जैवविविधता टिकवणे असे अनेक फायदे होतात. सध्या ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानात ही झाडे राहगिरांना छायेचा आश्रय देत आहेत.
मात्र अलीकडच्या काळात काही शेतकरी स्वार्थासाठी रस्त्याच्या कडेची तसेच शेतबांधावरील झाडे अवैध रित्या तोडत आहेत. नवीन शक्कल लढवत काळा कचरा, प्लास्टिक व इतर ज्वलनशील पदार्थ झाडांच्या मुळाशी टाकून ३० ते ४० वर्षे जुनी विशाल झाडे जाळली जात आहेत. अनेक ठिकाणी तर रोपे पूर्णपणे होरपळून नष्ट झाली आहेत.
पर्यावरणीय परिणाम गंभीर
या अवैध तोडीमुळे ऋतुचक्र बिघडत आहे, पावसाचे प्रमाण घटत आहे, तापमान वाढत आहे आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
*वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतींनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतील काय* . जाणून बुजून सदर विषयाकडे कांडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकाकडून होत आहे तसेच
दोषी शेतकरी व लाकूड माफियांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
रस्त्याकडेच्या झाडांच्या नियमित पेट्रोलिंग व देखरेख वाढवावी.
झाडे जगवण्यासाठी मनुष्यबळ व पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी.
“ *झाडे लावा, झाडे जगवा”* हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात येण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यावरणीय असंतुलनाचे दुष्परिणाम टाळणे कठीण होईल.

Post a Comment
0 Comments