> *ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून*
> *शासनाच्या उपसचिव सीमा जाधव यांचे सीईओ आणि आयुक्तांना आदेश*
अकोला : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली / फ स रीडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेव्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती या शहरी भागाच्या जवळ आहेत, अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी राबविण्यात येते. अतिदुर्गम, डोंगराळ भागात नेटवर्क कनेक्टीवीटी नसल्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. तथापि, सद्यस्थितीत बहुतांश भागामध्ये नेटवर्क कनेक्टीव्हीटी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती या शहरी भागालगत आहेत किंवा ज्या-ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्य आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक/जीपीएस हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. त्यामुळे आता ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांची बायोमेट्रिक/जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्याबाबत आणि उचित निर्णय घ्यावा, असे आदेश जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयुक्त यांना आले आहेत. गाव पातळीवर ग्रामसेवक यांची ग्राम विकासासाठी महत्वाची भूमिका असते; मात्र केवळ दिन जाओ, ची भूमिका घेत ग्रामसेवक आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असतात आणि नियुक्तीच्या गावात अभावानेच हजर असतात. त्यामुळे विविध दाखल्यांसाठी स्थानिक रहिवासी यांना ताटकळत राहून ग्रामसेवक कधी गावात येतात, याची वाट पाहत अखेर मोलमजुरी बुडवत घराकडे उदास मनाने परतत असतात तर त्यांची तक्रार करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात नागरिक पोहोचतात तेव्हा ग्रामसेवक तिथे हजर असतात. अश्या तक्रारी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर झाल्याने अखेर शासनाच्या उपसचिव सीमा जाधव यांच्या सहीचे आदेश राज्य स्तरावरून राज्यातील सर्व जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्तांना पोहोचले आहेत. त्यामुळे आता ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे
Post a Comment
0 Comments