नांदुरा शहरात ५०० फुटी भव्य तिरंगा महारॅलीने घुमला राष्ट्रप्रेमाचा हुंकार!
नांदुरा (प्रतिनिधी): भारतीय लोकशाहीचा उत्सव 'प्रजासत्ताक दिन' आणि 'राष्ट्रीय मतदार दिना'चे औचित्य साधून आज नांदुरा शहरात एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. ५०० फूट लांब भव्य तिरंगा ध्वजासह निघालेल्या महाकाय रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या महारॅलीला नांदुरा शहराच्या नगराध्यक्षा सौ. मंगला सुधीर मुऱ्हेकर यांनी हिरवी झंडी दाखवून रॅलीचा रीतसर प्रारंभ केला.
तहसीलदार श्री. अजितराव जंगम यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण नांदुरा शहर राष्ट्रप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले. ५०० फुटी तिरंग्याच्या माध्यमातून दिलेला हा संदेश नागरिकांच्या राष्ट्रभक्तीची साक्ष देणारा ठरला.
सकाळी ८:३० वाजता भारतीय ज्ञानपीठ शाळा येथून या अभूतपूर्व रॅलीला सुरुवात झाली. ५०० फुटी तिरंगा हातात धरून चालणारे शेकडो विद्यार्थी, राष्ट्रभक्तीपर घोषणा आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहर तिरंगामय झाले होते. ही रॅली केवळ राष्ट्रप्रेमाचाच नव्हे, तर मतदार जागृतीचाही एक व्यापक संदेश घेऊन शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत होती.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. मंगला सुधीर मुऱ्हेकर यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तहसीलदार श्री. अजितराव जंगम यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे, शिक्षकांचे आणि नागरिकांचे सहर्ष आभार मानले.
या महारॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालय आणि नगरपरिषद प्रशासनाच्या समन्वयाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या रॅलीने नांदुरा तालुक्यात राष्ट्रप्रेमाचे आणि लोकशाहीचे एक नवीन चैतन्य निर्माण केले आहे.

Post a Comment
0 Comments