*माटरगाव बु. येथे वीज वितरण कर्मचाऱ्यांची मनमानी? अशिक्षित मजुरांकडून विजेच्या खांबावर काम; हजेरी नोंदीतही अनियमिततेची तक्रार*
माटरगाव बु., ता. शेगाव (प्रतिनिधी) – माटरगाव बु. परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीज दुरुस्तीची कामे करताना काही वेळा वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून अवैध व अशिक्षित खासगी मजुरांकडून विजेच्या खांबावर चढून काम करून घेतले जात असल्याची तक्रार पुढे आली आहे.
वीज संबंधित कामे ही तांत्रिक आणि अत्यंत धोकादायक स्वरूपाची असल्यामुळे ती केवळ प्रशिक्षित व अधिकृत कर्मचाऱ्यांनीच करणे अपेक्षित आहे. मात्र अशिक्षित मजुरांकडून अशी कामे करून घेतली जात असल्यास कामगारांच्या जीवितास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, स्थानिक वीज उपकेंद्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत रात्री जर अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील. तसेच कार्यालयातील उपस्थिती नोंद (हजेरी रजिस्टर) मागील काही दिवसांपासून नियमितपणे भरली जात नसून ग्राहकांकडे उपस्थिती पत्राचे सही नसल्या बाबतचे पुरावे आहेत. या कारणांमुळे वीज पुरवठा दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच वीज वितरण सेवेतील शिस्त, पारदर्शकता व सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी माटरगाव बु. येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments