Type Here to Get Search Results !

काटेल धाम येथे दिव्यांग उपवर-वधू परिचय मेळावा उत्साहात

 


संग्रामपूर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम येथे दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला दिव्यांग उपवर-वधू परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. 

या मेळाव्यास विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग अशा सुमारे ३५० दिव्यांगांनी नोंदणी करून सहभाग घेतला.


नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड बुलढाणा, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगाव जामोद ,श्री संत गुलाबबाबा संस्था काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग व्यक्तींना योग्य जोडीदार मिळावा, त्यांचे सामाजिक पुनर्वसन व्हावे व त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाला बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ. अपर्णा कुटे ,रामेश्वर कलंत्री, बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मनोज मेरत, दिव्यांग क्रांती संघटना रायगडचे अध्यक्ष बी. जी. पाटील, मानस फाऊंडेशनचे प्रा. डी. एस. लहाने, श्रीक्षेत्र चांगेफळ संस्थानचे रामभारती महाराज, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोले, श्री संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र पालंदुरकर, विदर्भ अध्यक्ष अशोक तायडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. नंदू तायडे, लता तायडे नगरसेविका,

मनीष कोळपकर  माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत विविध मदतही देण्यात आली. सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वरवट बकाल येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रणव विजय सैरीसे याच्या आईच्या अपघाती निधनानंतर शाळेच्या विमा योजनेतून १ लाख रुपयांचा धनादेश त्याचे वडील विजय सैरीसे यांना प्रदान करण्यात आला. मेळाव्याचे संचालन प्राचार्य योगेश घाटोळे व प्रा. राजीव पुंडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य प्रकाश भुते, अमित धूत, शाखा व्यवस्थापक भूपेंद्र अवचार, संतोष केला, राजेश गांधी, शाम देवकर, मनोज गांधी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments